Friday, August 24, 2018

स्वीत्झर्लंड - एक अनुभव



सुहाना सफर और ये मौसम हंसी
हमे डर है हम खो न जाये कही...

ह्या ओळी साजेशा आहेत स्वीत्झर्लंड येथील प्रवासासाठी...बारा तासांचा प्रवास करून आम्ही शांघनू येथे  पोहचलो तेव्हा काळोख झाला होता. बाहेरचे काही दिसत नव्हते. कार Navigation च्या जोरावर Luxembourg, France आणि Germany असे तीन देश पार करून आम्ही स्वीत्झर्लंड मध्ये पोहचलो. Technology is a boon when used properly! रात्री थकून Swiss Chalet मध्ये झोपलो आणि सकाळी उठून बाहेर बघताच एकच फीलिंग होती..

"यह कहा आ गये हम..."





बाहेरच्या पोर्च मध्ये बसून चहा पिण्याची मजा घेताच समोरची छोटीशी नदी, त्यावरील पूल आणि भला मोठा पहाड आम्हाला खुणावत होता..घरी मॉर्निंग walk करायचा कंटाळा करणारे आम्ही  तेथे मात्र पायात चपला सरकवून लगेच निघालो. थंड वातावरण , नुकताच पडलेला पाऊस, आजूबाजूला तुरळक स्विस Chalet , चारही बाजूची हिरवळ असा walk जर करायचा असेल तर मी रोज morning walk करायला तयार आहे.ब्रिज जवळ पोहचलो तर पाण्याचा खळाळता आवाज मनाला धुंद करणारा होता..आमच्या तरुणपणीचा DDLJ आठवला (तरुणपणी म्हटले कारण शरीराने अर्धे म्हातारे झालोच आहे) तर DDLJ मध्ये पूलावरील  एक चित्रीकरण आहे. लगेच आम्ही Style मध्ये उभे राहून एक फोटो काढून घेतला..फक्त एका गुलाबाच्या फुलाची कमतरता होती :-)

काल झालेला प्रवास बर्‍यापैकी मोठा होता म्हणून आम्ही फक्त Lucerne city फिरण्याचे ठरवले. Lucerne Lake मधील निळ्याशार स्वच्छ पाण्यात पोहणारे पांढरे शुभ्र राजहंस पाहिले आणि "एका तळ्यात होती बदके पिले सुरेख" आठविल्याशिवाय राहिले नाही..राजहंस एक सुंदर, दिमाखदार पक्षी ..! निळ्याशार पाण्यामध्ये फिरताना त्याचा पांढरा  रंग उठूनच दिसतो. लोकांना अशा पक्षासोबत फोटो काढण्याची इच्छा व्हावी यात नवल ते काय..! त्यासाठी चिप्स बिस्किट सारखे वाटेल ते पदार्थ त्यांना खायला द्याला लोक कमी नाही करत..Please don't feed us ही पाटी सर्रास धुडकावून पक्ष्यांना खाऊ घालून त्यांच्यासोबत फोटो सेशन सुरू होते.. निसर्गाचा, पशू-पक्ष्यांचा, आजूबाजूच्या सृष्टीचा विचार करायला आपण कधी शिकणार आहोत कोण जाणे..


असो. Lucerne Lake मधील बोट सफारी एक शानदार Cruise आम्ही त्यानंतर अनुभवली..निळेशार पाणी त्यावर चमचमणारा प्रकाश मन मोहवणारे होते.पाण्याच्या आजूबाजूच्या डोंगर रांगा , त्यावरील ढग आठवण करून देत होते..."पर्वताची दिसे दूर रंग..काजळची जणू दाट रेघ.." आमच्या सोबत Japanese लोक होते ..त्यातील एकाचे कुंग फू स्टाइलफोटो सेशन सुरू होते.Cruise हा एक मस्त प्रकार असतो. आजूबाजूचे पाणी, मोकळी हवा आणि आपले विचार यांच्या संगतीत वेळ कसा निघून जातो कळत नाही. माणसाने काही गोष्टी जीवनात आवर्जून कराव्यात .त्यातील Cruise हा एक प्रकार आहे आणि आजूबाजूचे पाणी नितळ निळे स्वच्छ असेल तर क्या कहना!

Cruise झाल्यानंतर आम्ही Lucerne च्या लाकडी Chapel Bridge वर लेफ्ट राइट केले .युरोप मध्ये सर्वत्र दिसणारार सेट अप होता. Bridge, पाणी आणि पाण्याला लागून Restaurant..तासन तास हे लोक गप्पा मारत वाईन, बियर पित अशा ठिकाणी वेळ घालवू शकतात. घाई, गर्दी असा प्रकार नाही ..कुठे पोहचण्याचा विचार नाही.आयुष्याला अशी स्वस्थता लाभणे एक भाग्यच आहे..असो. Chapel Bridge चा दिमाखदार  फोटो काढून आम्ही Lion Monument ल निघालो.जर्मन सैन्यांनी पाठीत खंजीर खुपसून मारलेल्या स्विस सैनिकांचे स्मारक म्हणून Lion Monument उभारलेले आहे. सिंहाच्या डोळ्यातील करुण भाव चटकन डोळ्यात भरतात. आणि त्याच्या पाठीत खुपसलेला खंजीर मानवामधील हिंसक वृत्तीची आठवण करून देतो. हिंसा बाजूला सारून जगता आले असते तर हे जग आणखीनच सुंदर झाले असते नाही का?

दुसर्‍या दिवशी आम्ही Mount Titlis येथे बर्फ खेळण्यासाठी सज्ज झालो. तिटलीस येथे खूप भारतीय पर्यटक येतात. Thanks to Kesari, Veena World etc.. त्यामुळे येथे इंडियन restaurant पण आहे .पाव भाजी, वडा पाव, समोसा, मॅंगो लस्सी, इडली असा सगळ्यांचचा फडशा क्षणार्धात पडला. इडली शिवाय बाकी सगळे पदार्थ उत्तम होते. 

तिटलीस एवढे 'Indianized' आहे की Toilet मध्ये Toilet कसा वापरावा यासाठी हिन्दी मध्ये  पाटी आहे. (कृपया सीट पर बैठ जाइये.). वरती पर्वत माथ्यावर राज आणि सिमरन चा मोठा कट आऊट आहे. त्यांच्यासोबत फोटो न काढणे हा त्यांच्या Love Story चा अपमान आहे असा समज (की गैरसमज ?) करून आम्ही फोटो सेशन केले. 
पर्वताच्या वरती घेऊन जाण्यासाठि सतत फिरणार्‍या Cable Cars ह्या मानवाच्या कल्पक बुद्धीमत्तेची साक्ष देतात. इतक्या उंचावर बांधकाम करणार्‍या  Engineers ला सलाम..बर्फाने झाकलेले डोंगर बघण्याची इच्छा खूप आधीपासून होती पण ती प्रत्यक्ष उतरली वयाच्या पस्तीशीत. मग आमच्या लहान मुलांसोबत आम्ही पण लहान झालो.बर्फात मनसोक्त खेळलो ( की लोळलो? ) 

थंडी फारशी नव्हती. बर्फात घसरल्याने Jeans थोड्या ओल्या झाल्या होत्या. पूर्वतयारी फारशी न करण्याची मजाच काही और असते. घरी पोहचेपर्यंत काहीशा ओलसर जीन्स मध्येच आम्ही वावरत होतो. तिटलीस मध्ये वाहणार्‍या Glaciers मधील थंड Ice Cave पण आम्ही तशीच एंजॉय केली. बर्फाची गुहा असे आता आठवूनच मस्त वाटते.वापस येताना Cable Cars साठी रांग करून उभे असताना आमचे भारतीयत्व जागे झाले (योगायोगाने तो भारताचा स्वातंत्र्य दिन होता ) येथील cable cars वर विविध देशांचे झेंडे चिटकविलेले आहेत आणि ह्या cars सतत फिरत असतात. आम्ही भारताचा झेंडा असलेली car येईपर्यंत वाट पाहिली. 
हम हिंदुस्तानी !

भोवतालच्या भव्य पर्वत रांगांचा आस्वाद घेत खाली उतरलो. घरी पोहचेपर्यंत हिन्दी गाण्यांची अंताक्षरी मनसोक्त खेळलो. नवीन हिन्दी गाणी अंताक्षरी खेळताना आठवत नाही ही शोकांतिका खरी आहे हे वेगळे सांगायला नको. घरी पोहचलो तेव्हा समोरच्या पर्वतरांगांचा माथा मावळत्या उन्हात गुलाबीसर दिसत होता. तो देखावा केवळ अविस्मरणीय होता. आम्ही लगेच bridge कडे धाव घेतली. पण तो देखावा कमेर्‍यामध्ये टिपू शकलो नाही. खाली पोहचेस्तव तो गुलाबी रंग उडून गेला होता. दुसर्‍या दिवशी घरी लवकर पोहचून वाट पाहिली तरी तो रंग आला नाही. आयुष्यात काही गोष्टी केवळ एकदाच घडतात. तसेच काहीसे! 

तिसरा आणि शेवटचा दिवस इंटरलेकन मध्ये आकाशात भटकण्याचा होता. हौशीने बाहेर पडलो. इंटरलेकन च्या सुरूवातीला लागणार्‍या Lake चा निळाशार रंग, दुरून दिसणार्‍या पर्वताची पांढरी टोके डोळ्यात सामावून घेतली. इंटरलेकन ला पोहचलो तेव्हा Paragliding एका ठिकाणचे full झाले होते. दुसर्‍या ठिकाणी प्रयत्न करून Ticket मिळाले. Paragliding मनातल्या सर्व शंका कुशंका बाजूला सारून पूर्ण केले .. भावना एकच..
"पंछि बनु उडती फिरू मस्त गगन मे 
आज मै आझाद हून दुनिया के चमन मे"

मुलांनी स्विस आईस क्रीम, हिरवेगार मैदान , वाळू यांचा पुरेपूर आस्वाद घेतला.  इंटरलेकन मध्ये स्विस Souvenirs ची खरेदी केली. रस्त्यावर Glaciers मधून येणारे थंड पाणी नळांमधून वाहत होते. बिना फ्रिजचे थंडगार पाणी पहिल्यांदा प्यायलो तर वाटले..बस्स.. हेच अमृत असावे!

असा हा स्विस मधील तीन दिवसांचा प्रवास अविस्मरणीय आहे. स्विस मध्ये टुरिजम ज्या प्रकारे विकसित केले आहे त्यासाठी Hats off to them..! लाखो पर्यटक येतात पण गर्दी जाणवत नाही. उत्तम रास्ते, उत्तम सोयी! जर रस्त्याचे कामकाज सुरू असेल तर तेथे  One Way सुरू ठेऊन दोन्ही बाजूला आवर्जून ट्रॅफिक सिग्नल लावलेला असतो. त्यामुळे ट्राफिक जाम होत नाही. येथे आल्यावर एकच गोष्ट फक्त सलत राहते. आपले कश्मीर असे विकसित का नाही..मी कश्मीर कधी पाहिले नाही पण ते या समानच सुंदर आहे असे म्हणतात आणि केवळ मानवी दुष्ट प्रवृत्तींमुळे कश्मीर हे सुंदर ठिकाण चुकीच्या गोष्टींसाठी नावारूपाला आले आहे. असो. स्विस ची प्रतिमा डोळ्यात साठवून आम्ही निघालो तर केवळ एकच गोष्ट राहिली होती. निघताना 77 वर्ष जुन्या Swiss Chalet सोबत pic काढणे ..टुमदार, सर्व सोईनी सज्ज Chalet मध्ये सर्व कुटुंबियांनी एकत्र घालविलेले क्षण मोलाचे आहेत. मोठ्या काकांचा वाढदिवस, सोबत केलेला स्वयंपाक, लहानांचे न भांडता एकत्र खेळणे, अंगणातील apple, Pear, black berry ची झाडे अशी त्या घराची आठवण सोबत राहील. 

स्विस हे एक स्वप्न आहे आणि ते प्रत्यक्षात उतरणे भाग्य आहे. एकच ओळ (शंकर महादेवनची ) स्वीत्झर्लंड साठी मनात गुणगुणत राहते.

"कैसे कभी लगता है स्वर्ग अगर है तो बस है यही पर!"

स्वीत्झर्लंड मधील सृष्टी सौन्दर्य Breathless मधील  ह्या ओळीसारखे  श्वास रोखणारे आहे हे मात्र खरे .. !

No comments:

खूप आनंदी आहे आयुष्य

खूप आनंदी आहे आयुष्य  भरभरून जगले तर  सुख दुःखांच्या पार जाऊन  क्षणाक्षणांनी वेचले तर  खूप आनंदी आहे आयुष्य  टवटवीत ठेवले तर  भरल्या आभाळाकड...