मन म्हणालं...
आपणच आपलं जग शोधावं...
काहीसं रंगीत,
थोडसं ब्लॅक अँड व्हाईट
रंगसंगतीच्या पल्याड जाणारं...
पावसाच्या थेंबात प्रतिबिंब बघत
सुरांच्या दुनियेत स्तब्ध होणारं...
अक्षरांच्या गर्दीत वाक्य शोधत
वाक्यांमध्ये अर्थ वेचणारं...
आपणच आपलं जग शोधावं...
पदार्थांच्या यादीत
जगण्याचा मेनू निवडत
जगण्यावर
खुशाल ताव मारणारं...
मातीला स्मरून
तार्यांच्या अंबरात फिरत
आपणच आपलं जग शोधावं...
शरीरावरील वयाच्या खुणा
न लपवताही
किंचितसा मेक अप करून
गालावरील हास्यफुल
सदा उमलते ठेवत
दुःखाच्या कोंदणात
थोडेसे सुख पेरत
आपणच आपलं जग शोधावं..